छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कोडीन सिरप आणि एमडी ड्रग्जची तस्करी करणार्या शेख अश्फाक शेख इसाक ऊर्फ अश्फाक पटेलच्या सिंडिकेटवर गुन्हे शाखा वारंवार घाव घालत आहे. आतापर्यंत पुरवठादार आणि पेडलर्स अशा एकूण १७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० जणांना अटक केलेली आहे. मुख्य आरोपी अश्फाक फरार आहे. त्याचे पैशांचे व्यवहार पाहणार्या मैत्रिणीला गजाआड केले आहे. बुधवारी (दि. ११) गुन्हे शाखेने शहाबाजार भागात ही कारवाई केली.
इशरत अकीब शेख (२८, रा. रवींद्रनगर, शहाबाजार), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ती अश्फाकच्या शेजारी राहते. ती त्याची जवळची मैत्रीण असून तिचे अनेक आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. इशरतला बुधवारी अटक केल्यानंतर गुरुवारी (दि. १२) न्यायालयात हजर केले. तिला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ती या संपूर्ण सिंडिकेटचे आर्थिक व्यवहार सांभाळत होती. शिवाय, फरार कळात अश्फाकला पैसे उपलब्ध करून देत असावी, असाही संशय आहे. आतापर्यंत अश्फाकच्या टोळीतील १७ आरोपींविरुद्ध ४ गुन्हे दाखल केले असून ११ जणांना अटक केली आहे.
या कारवाईत सिरपच्या सुमारे ११ हजार ७९९ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने २४ जानेवारीला पाठलाग करून लातूरहून आलेला सिरपचा ३ हजार १२० बाटल्यांचा साठा जप्त केला होता. तेव्हा शेख समीर, सय्यद अल्ताफ आणि उमर अब्दुल या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अश्फाकचे ड्रग्ज न सिंडिकेट सिंडिकेट रडारवर रडारवर आलेले होते. २५ जानेवारीला गुन्हे शाखेने लातूरमध्ये छापे मारून ४ हजार बाटल्या जप्त केल्या होत्या. तेव्हा सय्यद शाहीदअली सय्यद इब्राहीम अली (३०, रा. उदगीर) याला अटक केली होती.
३ फेब्रुवारीला गुन्हे शाखेने पुन्हा शहाबाजारमध्ये छापा मारून अश्फाकच्या दुसर्या सप्लाय चेनचा पर्दाफाश केला आणि सिरपच्या ३ हजार बाटल्या जप्त केल्या होत्या. यावेळी ओबेदुल्ला अब्दुला, शेख सोफियान शेख नजीर, अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान, शेख नावेद शेख हमीद, शेख अय्याज ऊर्फ शेरू शेख सिराज या पाच जणांना अटक केली होती.











